शेरलॉक होम्स
शेरलॉक होम्स | |
---|---|
सिडनी पेजेट याने रेखलेले इ.स. १९०४ मधील कल्पनाचित्र | |
कार्यकाल |
इ.स. १८७७ - इ.स. १९१४ |
लेखक |
सर आर्थर कॉनन डॉयल |
माहिती | |
सहकारी | डॉ. वॉटसन |
व्यवसाय | सत्यान्वेषी |
कुटुंब | मायक्रॉफ्ट होम्स (मोठा भाऊ) |
राष्ट्रीयत्व | इंग्लंड |
तळटिपा |
शेरलॉक होम्स (इंग्लिश: Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स इंग्लंडमधील लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे.
१८८७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या होम्सवर डॉयल यांनी ४ कादंबऱ्या आणि ५६ लघुकथा लिहिल्या. “अ स्टडी इन स्कार्लेट” ही पहिली कादंबरी “बीटन्स ख्रिसमस ॲन्युअल” नावाच्या वार्षिकात १८८७ या वर्षी प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी “द साइन ऑफ फोर”, 'लिपिनकॉट्स मंथली मॅगेझीन' या मासिकेत १८९० साली प्रकाशित झाली. या नंतर इ.स.१८९१ ते १९२७ पर्यंत “द स्ट्रँड मॅगझीन” मध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथांमधून होम्स या पात्राला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कथानकातील घटना १८८० ते १९१४ या कालावधीत घडतात.
शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही मराठी कथांमधे, उदाहरणार्थ भा.रा. भागवतांची पुस्तके, शेरलॅाकला "शरलॅाक" असे संबोधलेले दिसते.
डॉयल यांनी या कथा, होम्सचे सहकारी, मित्र आणि चरित्रकार डॉक्टर जॉन एच. वॉटसन हे कथन करीत आहेत, अशा पद्धतीने लिहिल्या आहेत. एकूण कथांपैकी केवळ चार वगळून बाकी सर्व कथांचे कथन डॉ. वॉटसन करतात. राहिलेल्या चार पैकी दोन कथांचे कथन स्वतः होम्स करतात आणि दोन कथा तृतीय-पुरुष दृष्टिकोनातून सांगितल्या गेल्या आहेत.
पात्ररचनेमागील प्रेरणा
[संपादन]शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्रोत हे डॉ. जोसेफ बेल हे आहेत, असे डॉयल यांनी नमूद केले आहे. डॉयलनी जोसेफ बेल यांच्या एडिंबरो रॉयल इन्फर्मरी या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असत. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या महाविद्यालयामधील व्याख्याते सर हेन्री लिटलजॉन हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहेत असे मानले जाते. त्यांनी पोलीस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. या दोघांंमुळे सर आर्थर यांना गुन्हे अन्वेषणासाठी वैद्यकीय तपासणी आणि सूक्ष्म निरीक्षणे यांची जोड मिळाली.
वैयक्तिक जीवन
[संपादन]डॉयल यांनी लिहिलेल्या कथांमध्ये होम्सच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अथवा नातेवाइकांबद्दल खूप कमी माहिती मिळते. “हिज लास्ट बो” या कथेतील घटना १९१४ मध्ये घडतात. या कथेमध्ये होम्सचे वय ६० वर्ष असल्याचे सांगितले गेले आहे. यावरून होम्सचे जन्म १८५४ मध्ये झाल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'द न्यू ॲनोटेटेड शेरलॉक होम्स”चे लेखक लेस्ली क्लीन्जर यांनी होम्सची जन्मतारीख ६ जानेवारी असल्याचे म्हणले आहे.
सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून काढायचे निष्कर्ष यांचा अभ्यास पदवीपूर्व काळातच चालू केल्याचे होम्स सांगतात. त्यांनी केलेली सुरुवातीची अन्वेषणे ही त्यांच्याचबरोबर शिकत असलेल्या सोबती विद्यार्थ्यांसाठी केल्याचे कळते. होम्स सुट्टीसाठी एका मित्राच्या घरी गेलेले असताना, त्या मित्राचे वडील होम्सचे निरीक्षणकौशल्य पाहून त्यांना सत्यान्वेशी होण्याचा सल्ला देतात. शिक्षण पूर्ण केल्यावर ६ वर्षे होम्स गुन्हे अन्वेषणाचे काम करतात. त्यानंतर आर्थिक ताणामुळे घरभाडे एकट्याला परवडत नसल्यामुळे ते डॉ. वॉटसन यांच्याबरोबर २२१ बी. बेकर स्ट्रीट या पत्त्यावर घर भाड्याने घेतात व तेथे राहू लागतात. एकत्र राहू लागल्यानंतर डॉ. वॉटसन होम्सच्या अन्वेषणकार्यामध्ये रुची घेऊ लागतात आणि त्यांच्या कामात त्यांना मदत करू लागतात. २२१ बी. बेकर स्ट्रीट येथील त्यांचे वास्तव्य १८८१ पासून झाल्याचे कळते. २२१बी हे घर “बेकर स्ट्रीट” या रस्त्याच्या सुरुवातीलाच असून, घराच्या पहिल्या मजल्यावर होम्सची व दुसऱ्या मजल्यावर डॉ. वॉटसन यांची खोली असते.
डॉ. वॉटसनशी ओळख व्हायच्या आधी होम्स एकटेच काम करत असत. क्वचित प्रसंगी ते काही विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी रस्त्यावरील उनाड मुलांची मदत घेत असत. या उनाड मुलांच्या टोळीला “द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स” असे नाव त्यांनी ठेवले होते. 'द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स'चा उल्लेख ३ कथांमध्ये होतो: 'अ स्टडी इन स्कार्लेट', 'द साइन ऑफ फोर' आणि 'द ॲडव्हेंचर ऑफ द क्रुकेड मॅन'
होम्सच्या पालकांचा उल्लेख कुठल्याही कथेत नाही, मात्र त्यांचे पूर्वज धनिक जमीनदार असल्याचे स्वतः होम्स एका प्रसंगी सांगतात. 'द ॲडव्हेंचर ऑफ द ग्रीक इंटरप्रीटर' या कथेमध्ये ते हॉरेस वेर्ने नावाच्या आपल्या फ्रेंच काकांचा उल्लेख करतात. ७ वर्षांनी मोठे असलेले होम्सचे वडील बंधू मायक्रॉफ्ट होम्स यांची ३ कथानकांमध्ये महत्त्वाची भूमिका असून एका कथेमध्ये त्यांचा नुसता उल्लेख आहे. मायक्रॉफ्ट होम्स हे ब्रिटिश सरकारमध्ये एका महत्त्वाच्या पदावर होते. अनेक सरकारी विभागांसंदर्भातील बरीच महत्त्वाची माहिती लक्षात ठेवून ती योग्य ठिकाणी आणि प्रसंगी वापरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. सूक्ष्म निरीक्षण करण्याची आणि निष्कर्ष काढण्याची कला त्यांच्यापेक्षाही त्यांच्या बंधूंमध्ये कित्येक पटीने अधिक असल्याचे होम्स डॉ. वॉटसन यांना सांगतात. पण स्वभावाने आळशी असल्यामुळे थोरले होम्स आपला बराचसा वेळ त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या एका क्लब - “डायोजिनीज क्लब” - मध्ये घालवत असत.
नातेसंबंध
[संपादन]शेरलाॅक माणूसघाणा असल्याने त्याच्या नातेसंबंधात फारच मोजके लोक येतात. डॉ. वॉटसन त्याचा सहकारी आणि सर्वात जवळची व्यक्ती म्हणून दिसते. शेरलाॅकचा सख्खा थोरला भाऊ मायक्राॅफ्ट काही वेळा कथांत अवतरतो, मात्र या भावांतील नाते फारसे उलगडत नाही. शेरलाॅकच्या आयुष्यातील दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची घरमालकीण हडसन बाई. त्यांच्याशी तो तुटक वागत असला तरी या दोघांत आपुलकीचे नाते दिसते. बऱ्याच चलचित्रांत, उदाहरणार्थ, बीबीसीच्या ''शेरलॉक''(२०१०) या मालिकेत[१], खासकरून दुसऱ्या पर्वामधील पहिल्या भागात, या दोघांचे नाते परस्परांशी तुसडेपणे वागणाऱ्या मात्र एकमेकांवर प्रेम असणाऱ्या मायलेकांसारखे दाखवले आहे. एरवी स्त्रियांबद्दल काही आकर्षण नसणारा शेरलाॅक 'ए स्कॅन्डल इन बोहेमिया', बोहेमियातील भानगड, या कथेत आलेली आयरीन ॲडलर नावाच्या स्त्रीबद्दल फार आदराने बोलताना दिसतो. आयरीन ॲडलरने त्याला पराभूत केलेले असते. या कथेची सुरुवात आणि शेवट पाहता शेरलाॅक आयरीन ॲडलरकडे आकर्षित झालेला दिसतो. या कथेचा वापर करून शेरलाॅक आणि आयरीन ॲडलर यांच्यातील प्रेमकथा बीबीसीच्या शेरलाॅक (२०१०) मालिकेत बनवलेली दिसते. शेरलाॅकचा कट्टर शत्रू म्हणून प्रा.जेम्स मोरीआर्टी दिसतो. याच्याशी दोन हात करतानाच शेरलाॅकला मृत्यू आलेले "दि फायनल प्राॅब्लेम"मधे दाखवले आहे.
डॉ. वॉटसन यांच्या बरोबरचा काळ
[संपादन]होम्सनी एकूण २३ वर्षे अन्वेषणाचे कार्य केले. त्यांपैकी १७ वर्षे ते डॉ. वॉटसन त्यांच्या सोबत होते. १८८७ मध्ये डॉ. वॉटसनच्या लग्नाआधी आणि पुढे त्यांचा पत्नीच्या निधनानंतर ते एकत्र राहत होते. २२१-बी बेकर स्ट्रीट येथील त्यांच्या घराची मालकीण मिसेस हडसन त्यांची घरगुती कामे व घराची देखरेखही करे.
बऱ्याचशा कथा डॉ. वॉटसन अन्वेषणाचा सारांश करत असल्याच्या पद्धतीने लिहिल्या गेल्या आहेत. होम्स अनेकदा डॉ. वॉटसनच्या सारांशिक लिखाणावर तीव्र टीका करत. त्यांचे म्हणणे असे की डॉ. वॉटसन सारांश लिहितांना मूळ अन्वेषणापेक्षा संबंधित लोकांची मनस्थिती आणि भावनांवर आणि घटनांच्या रंगीत चित्रणावर जास्त भर देत. त्यामुळे त्या सारांशाचे मुख्य बिंदू निष्कर्षणविज्ञान नसून व्यक्तिरेखा आणि घटना वर्णन असे.
लिखाणासंदर्भात दुमत असूनही त्यांच्यातील मैत्री घनिष्ट होती. एका प्रसंगी डॉ. वॉटसन यांना बंदुकाची गोळी लागते. अखेरीस जखम सौम्यच असल्याचे कळते पण आपल्याला गोळी लागल्यामुळे झालेली होम्सची तडफड पाहून डॉ. वॉटसनचे मन भरून येते. होम्सची भावनाशून्य स्वभावाची सवय असलेल्या डॉ. वॉटसनना त्यांची अशी प्रतिक्रिया पाहून सुखद धक्का बसतो[२].
द ग्रेट हाईट्स – होम्सच्या जीवनातील अदृश्य खंड
[संपादन]१० वर्षे होम्सच्या कथा रेखाटल्यानंतर, आपल्या इतिहासविषयक लिखाणावर लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने डॉयल यांनी १८९३ मध्ये प्रकाशित कथा “द फायनल प्रॉब्लम” मध्ये होम्सच्या पात्राचा अंत केला. या कथेतील घटना १८९१ च्या वर्षात घडतात. राईशेनबाखच्या धबधब्यात प्रा. मॉरियार्टी बरोबरच्या सामन्यात पाय घसरून दरीत पडल्यामुळे होम्स आणि मॉरियार्टी दोघांचा मृत्यू होतो. होम्सच्या चाहत्यांना त्यांच्या मृत्यूचा स्वीकार नाही झाला आणि ते डॉयलकडे होम्सच्या कथा पुन्हा लिहिण्यास सुरू करण्याचा आग्रह करत राहिले. आठ वर्षे या आग्रहाचा प्रतिकार केल्यानंतर १९०१ मध्ये त्यांनी 'द हाऊंड ऑफ बास्करव्हिल' ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीतील घटना होम्सच्या मृत्युपूर्व काळात घडतात. १९०३ मध्ये प्रकाशित (आणि १८९४ मध्ये घडलेल्या) कथा 'द ॲडव्हेंचर ऑफ द एम्टी हाउस' मध्ये डॉयल यांनी होम्सला अखेर पुन्हा जीवित केले. मानसिक संघर्षानंतर होम्सच्या मृत्यूचा स्वीकार केलेल्या डॉ. वॉटसनला होम्सला जिवंत बघून धक्का बसतो. आपल्या शत्रूंना चुकवण्यासाठी मरण्याचा ढोंग केल्याचे होम्स डॉ. वॉटसनला सांगतात. होम्सवर आधारित कथांचा दुसरे पर्व या कथेनी सुरू होतो. दुसरे आणि शेवटचे पर्व १९२७ पर्यंत चालले.
पहिल्या आणि दुसऱ्या पर्वांमधील काळ (१८९१ ते १८९४) – म्हणजेच “द फायनल प्रॉब्लेम”मधील त्यांच्या मृत्यूपासून “द ॲडव्हेंचर ऑफ द एम्टी हाउस” मधील त्यांच्या परतीपर्यंतच्या काळाला होम्सच्या चाहत्यांनी “द ग्रेट हायॅटस” – म्हणजेच होम्सच्या अदृश्यतेचा काळ - असे नाव दिले आहे. 'द ग्रेट हाईट्स' या वाक्प्रचाराचा सर्वात पहिला वापर एडगर स्मिथ यांनी जुलै १९४६ मध्ये प्रकाशित त्झालेल्या 'शेरलॉक होम्स ॲडव्हेंचर द ग्रेट हाईट्स या लेखात केला. हा लेख 'बेकर स्ट्रीट जर्नल' या मालिकेत प्रकाशित झाला होता. १९०८ मध्ये प्रकाशित कथा 'द ॲडव्हेंचर ऑफ व्हिस्टीरिया लॉज' मधील घटना १८९२ या वर्षी घडल्याचे वर्णन डॉयल यांनी चुकून केल्याचे आढळते.
निवृत्ती
[संपादन]'हिज लास्ट बो' या कथेमध्ये होम्स आपल्या कामातून निवृत्ती घेऊन “ससेक्स डाउन्स” भागात राहण्यास गेल्याचे कळते. तिथे त्यांनी मधमाश्या पाळण्याचे काम हाती घेतल्याचेही कळते. या विषयावर ते एक पुस्तकही प्रकाशित करतात. या कथेमध्ये होम्स आणि डॉ. वॉटसन काही काळासाठी आपल्या निवृत्त जीवनाचा त्याग करून, पहिल्या विश्वयुद्धात हातभार देण्यास काही अन्वेषणे करतात. 'हिज लास्ट बो' व्यतिरिक्त 'द ॲडव्हेंचर ऑफ द लायन्स मेन' ही एकच कथा होम्सच्या निवृत्ती पश्चात घडते. होम्सच्या मृत्यूबद्दल कुठलीच माहिती आढळत नाही.
व्यक्तिमत्त्व व सवयी
[संपादन]शेरलॅाक उंच आणि सडपातळ आहे. त्याचे मस्तक मोठे असून नाक धारदार आहे. केस काळे आहेत. त्याची नजर भेदक आहे. अफूच्या सेवनामुळे त्याचे डोळे किंचित फिकट वाटतात; ते काळे आहेत. त्याची बोटे सडपातळनी लांब आहेत. शेरलॅाकला दाढी-मिशा आहेत का, हा बराच चर्चिला गेलेला विषय आहे. फारच क्वचित् दाढी वा मिशी असलेला शेरलॅाक चित्रांत वा चलचित्रांत दिसतो. मात्र ' रिटर्न आॅफ शेरलॅाक होम्स्'मधे वॉटसन 'तू दाढीमिशा वाढवल्यात', अशा आशयाचे विधान करताना दिसतो. यावरून शेरलॅाकला दाढी-मिशा नाहीत, असा निष्कर्ष काढता येतो.
शेरलॅाक पाईपमधून तंबाखू ओडतो. विचार करताना तो धूम्रपान करतो, बऱ्याचदा अतिविचार करताना वा काहीही काम नसले की तो अफू घेतो.
शेरलॅाक मितभाषी आहे. मात्र वाॅटसनसोबत तो बरेच बोलतो. अनेकदा तो फार लहरीनी विक्षिप्त वागतो. शेरलॅाक भुतांखेतांवर विश्वास ठेवत नाही. तो मुळात खूप आळशी आहे; केवळ घरी बसून विचार करायला त्याला आवडते. त्याला बाहेर पडून शारीरिक श्रम करत काम करणे आवडत नाही. मात्र, वेळ पडल्यास तो हे लीलया करतो. शेरलॅाकला मुष्टियुद्धाची आवड आहे, तो तलवारबाजीतही प्रवीण आहे. त्याला अभिनय आणि वेषांतर उत्तम साधते. वाॅटसनलाही कळणार नाही असे वेषांतर तो करतो.
शेरलॅाक इंग्लंडमधील प्रत्येक भागातील मातीचे गुणधर्म माहिती आहेत. त्याने विविध प्रकारच्या तंबाखूंचानी सिगरेटच्या राखेचा अभ्यास केला आहे; तो केवळ राखेवरून सिगरेटचा प्रकारनी उत्पादक ओळखू शकतो. त्याचा कागद आणि शाईंचा अभ्यासही उत्तम आहे.
होम्सला स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची फारशी काळजी नसे. एखाद्या अन्वेषणात तल्लीन झाल्यावर अन्न ग्रहण करण्याचीही त्याला गरज भासत नसे. खाल्लेल्या अन्नाला पचवण्यामध्ये शारीरिक ऊर्जा वाया जाते असे त्यांचे मत असे. होम्सना सिगारेट, सिगार आणि चिलीम (pipe) ओढण्याची सवय होती. डॉ. वॉटसन त्यांच्या या व्यसनाची विशिष्ट निंदा करत नसला तरी या वस्तूंमुळे खोलीत निर्माण होणाऱ्या विषारी वातावरणाची निंदा मात्र नेहमी करे.
आपल्या संशोधन पद्धतीला शेरलॅाक Science of deduction म्हणतो. ही पद्धत म्हणजे बारीक निरीक्षणांतून माहिती गोळा करायची, तिचे वस्तुनिष्ठ पृथक्करण करायचे आणि तर्क बांधायचे. शेरलॅाकचे तर्क क्वचितच चुकत.
एखाद्या निष्पाप व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध करून त्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी होम्स कित्येकदा पुरावे लपवणे, वस्तुस्थितीत फेरबदल, घरफोडी अशे कृत्य करत. हे कृत्य नैतिक पातळीवर न्याय्य असल्यामुळे डॉ. वॉटसनची त्यांना नुसती संमतीच नसून त्यांत त्यांचा सहभागही असे. पण कधी कधी गुन्हे सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत होम्स निरपराधी व्यक्तींची हाताळणी करत. अंतिम ध्येय कितीही नैतिक असले तरी निरपराधी लोकांना त्रास देऊन ते साधणे हे डॉ. वॉटसनना कधीच पटत नसे. ‘द ॲडव्हेंचर ऑफ चार्ल्स ऑगस्टस मिल्व्हर्टन’ या कथेमध्ये चार्ल्स ऑगस्टस मिल्व्हर्टन नामक गुन्हेगाराविरुद्ध पुरावे शोधात असताना, होम्स त्याच्याच घरातील एक मोलकरणीची मदत मिळवण्यासाठी तिला लग्नाचे खोटे वचन देतात. नंतर होम्सने असे केल्याचे कळाल्यावर डॉ. वॉटसन त्यांची निंदा करतात.
अनेक प्रसंगी होम्सवर ब्रिटिश सरकारच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या आणि गुप्त विषयांचे अन्वेषण करण्याची जबाबदारी पडत असे.
निरीक्षणकौशल्याने पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यात होम्सना आनंद मिळत असे. आपल्या निरीक्षणकौशल्यावर त्यांना खूप आत्मविश्वास असे. पण इतके कौशल्य असूनही त्यांनी कधीच प्रसिद्धीची इच्छा दर्शवली नाही. आपल्या कामाचे नावलौकिक ते नेहमीच पोलिसांना घेऊ देत असत. ब्रिटिश सरकारतर्फे बहाल केलेले सरदारपदही (knighthood) ते नाकारतात. लंडन शहराबाहेरील पोलीस देखील, योगायोगाने होम्स जवळपास असल्यास त्यांची मदत घेत. डॉ. वॉटसन यांनी प्रकाशित केलेल्या लेखांमधून होम्सना खरी प्रसिद्धी मिळते. या प्रसिद्धीमुळे कित्येक गरजू लोक आपल्या समस्येच्या समाधानासाठी होम्सकडे येत. लोकांना होम्सवर पोलिसांपेक्षा जास्त विश्वास असल्याचे कळते. हा विश्वास होम्सच्या प्रसिद्धीबरोबर वाढत गेलेला दिसतो. लंडनचे पंतप्रधान आणि बोहेमियाचे राजा देखील २२१-बी येथील होम्सच्या निवासस्थानात, काही राष्ट्रस्तरीय व संवेदनशील समस्यांबाबत त्यांची भेट घेऊन त्यांची मदत मागतात.
प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत.
डॉ. वॉटसनव्यतिरिक्त इतर कोणाच्याही मैत्री अथवा संगतीला ते प्रोत्साहन देत नसत. डॉ. वॉटसनचे एक मित्र एकदा त्यांना व होम्सना सुट्टीसाठी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण देतात. डॉ. वॉटसनचे मित्र अविवाहित असून त्या घरात त्यांना पूर्ण मोकळीक मिळणार, केवळ या कारणाने तिथे जायला होम्स तयार होतात. ‘द ॲडव्हेंचर ऑफ द ग्लोरिया स्कॉट’ या कथेमध्ये होम्स डॉ. वॉटसना सांगतात की त्यांच्या २ वर्षांच्या विद्यालयीन काळातही त्यांचा व्हिक्टर ट्रेवर नावाचा एकच मित्र होता. ते करत असलेला अभ्यास हा त्यांच्या सोबती विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यांच्यात मिसळण्याची किंवा त्यांच्या सोबतीत वेळ घालवण्याची त्यांना संधीही मिळत नसे आणि त्याची गरजही त्यांना भासत नसे.
संगीत, विशेषतः व्हायोलीन वादनाची होम्सना आवड होती. ते स्वतः उत्तम व्हायोलीन वादन करत. ‘द ॲडव्हेंचर ऑफ द रेड हेडेड लीग’ मध्ये होम्स आपल्या अन्वेषणकार्याला काही काळ विराम देऊन विश्रांती करता पाब्लो डे सारासाटे यांचे व्हायोलीन वादन ऐकायला जातात. गायनात (विशेषतः वाग्नर यांच्या संगीतात) असलेली त्यांची रूची ‘द ॲडव्हेंचर ऑफ द रेड सर्कल’ मध्ये दिसून येते.
मादक पदार्थांचा वापर
[संपादन]जटिल समस्या सोडवण्यामध्ये त्यांचे मन सक्रिय आणि क्रियाशील राही, पण अन्वेषणकार्यात गुंतलेले नसले तर होम्सची कंटाळवाणी अवस्था होई. अशावेळी ते कोकेनचे ७% सौम्य मिश्रणाचे इंजेक्शन घेत. क्वचित प्रसंगी होम्स मॉरफीनचाही वापर करत, पण कोकेनइतके त्यांना मॉरफीन आवडत नसे. १९-साव्या शतकातील इंग्लंडमध्ये या दोन्ही पदार्थांचा वापर कायदेशीर होता. एका डॉक्टरच्या नात्याने व त्यांचा एकुलता एक मित्र या नात्याने डॉ. वॉटसन होम्सच्या या व्यसनाचे तीव्र विरोध करत. होम्सच्या मानसिक आरोग्यावर आणि बुद्धिमत्तेवर होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना सतत काळजी लागून असे.
तंबाखू, सिगारेट, सिगार यांचे सेवन होम्स व डॉ. वॉटसन दोघे करत. होम्स केवळ राखेवरून सिगारेट किंवा सिगारची छाप ओळखत. ‘द ॲडव्हेंचर ऑफ द मिसिंग थ्री-क्वॉर्टर’ मध्ये होम्सची ड्रग्सच्या वियोगाची सहनशक्ती वाढलेली दिसते. असे असले तरी होम्सचे व्यसन कायमचे निघून गेले नसून केवळ सुप्तावस्थेत असल्याची चिंता डॉ. वॉटसन याच कथेत प्रकट करतात.
शेरलॅाकचा प्रभाव
[संपादन]शेरलॅाकचा प्रभाव नंतरच्या सर्वच गुप्तहेरकथांवर जाणवतो. बंगालीतील व्योमकेश बक्षी यांच्यावर व सत्यजित राय यांच्या फेलूदावरही हा प्रभाव दिसून येतो. शेरलाॅकवरचे चलच्चित्रपट इतके प्रसिद्ध पावले की ऑर्थर काॅनन डाॅयल यांना इंग्लंडच्या राणीने 'सर' हा किताब दिला. दि फायनल प्राॅब्लेम (The Final Problem) कथेमधे डाॅयल यांनी शेरलाॅक आणि जेम्स मोरीआर्टी यांच्या झटापटीत दोघे राईशेनबाख धबधब्यावरून पडून मृत्युमुखी पडतात असे दाखवले. शेरलाॅकला संपवायचे, असा त्यांचा साधा हेतू होता. मात्र यावर जगभरातील वाचक खवळले. परिणामी त्यांना "His Last Bow" मधील शेरलाॅकच्या आठवणी लिहाव्या लागल्या. त्यातही वाचकांचे समाधान न झाल्याने, अखेरीस "The Return of Sherlock Holmes" कथातून त्यांना शेरलाॅकला परत जिवंत करावे लागले.
शेरलॅाकचा कथेतील पत्ता "२२१बी , बेकर रस्ता, लंडन " असा आहे. या रस्त्यावर मुळात लंडनमधे २२१बी क्रमांकाचे घरच नव्हते. जेव्हा रस्ता वाढून ही घरे बनली, तेव्हा २२१बी क्रमांकाचे घर २२१बी शेरलॅाक संग्रहालयाकरिता राखून ठेवले गेले.
मूळ कथा प्रकाशित होताना बऱ्याच लोकांना शेरलॅाक खरा मनुष्य आहे, असे वाटे.
मराठी भाषांतरे
[संपादन]सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. ऑर्थर कॅनाॅन डाॅयल यांच्या मूळ कथा जरी केवळ कुमारांसाठी नसल्या, तरी कुमारांसाठी या कथांचे इंग्रजी सोपे रूप केले गेले आहे. मराठीतील बव्हांशी भाषांतरे कुमारांसाठी केली गेली आहेत. त्यांतली काही अशी : -
- संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर)
- शेरलाॅक होम्सच्या चातुर्यकथा (दिलीप चावरे, डायमंड प्रकाशन)
- शेरलॉक होम्सचं पुनरागमन (दिलीप चावरे)
- शेरलाॅक होम्सच्या साहसकथा (दिलीप चावरे, डायमंड प्रकाशन)
- शेरलॉक होम्सः सुपर-ब्रेन ("द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल" व "द व्हॅली ऑफ फिअर" या दोन कादंबऱ्या). लेखक - पंढरीनाथ सावंत.
- शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल (प्रवीण जोशी)
- द व्हॅली ऑफ फियर (कादंबरी, लेखक - प्रवीण जोशी)
- शेरलॉक होम्सच्या पाच कथा-द ॲडव्हेंचर्स ऑफ चार्ल्स ऑगस्टस मिलव्हर्टन (घात आणि आघात), द डिसॲपिअरन्स ऑफ लेडी फ्रॅन्सिस कार फॅक्स (काळ आला होता पण...), द ॲडव्हेंचर ऑफ ब्लॅक पीटर (काळोखातले कृष्णकृत्य), द ॲडव्हेंचर्स ऑफ द डेव्हिल्स फूट (सैतानी पाऊल) आणि द प्रॉब्लेम अँड थॉर ब्रिज (थॉर ब्रिजवरचे सूडनाटय). लेखिका - बिंबा केळकर.
- शाबास, शेरलॉक होम्स! : ( भा.रा. भागवत), उत्कर्ष प्रकाशन (पाच पुस्तके)
- शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा भाग १ ते ६, (भालबा केळकर)
- बॅस्करव्हीलचा शाप : (रमेश मुधोळकर), अनमोल प्रकाशन)
- साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान)
- शेरलॉक होम्सच्या कर्तृत्त्व कथा (जयको प्रकाशन)
- शेरलॉक होम्सच्या साहसी कथा (जयको प्रकाशन)
- शेरलॉक होम्सच्या अखेरच्या काही साहसी कथा (जयको प्रकाशन)
चलच्चित्रपट
[संपादन]शेरलॅाकवर कृष्णधवल चित्रपट काळापासून चलच्चित्रपट अणि मालिका बनल्या आहेत.
- जेरेमी ब्रेटची "शेरलॅाक होम्स" मालिका[३] अतीशय प्रसिद्ध आहे. यातील ब्रेटचा शेरलॅाक वाचकांनाही भावतो.
- (२००९) "शेरलॅाक, भाग-१,२" नामक राॅबर्ट डाऊनी ज्यु.चे चित्रपट[४],[५] बरेच चालले, मात्र वाचकांना यातील शेरलॅाक आॅर्थर काॅनन डाॅयलच्या शेरलॅाकहून फारच वेगळा वाटला[६].
- (२०१०) बीबीसीने काढलेल्या "शेरलॅाक"मालिकेत शेरलॅाक आधुनिक काळात आसलेला दाखवलाय [७]. ही मालिका प्रचंड गाजली. यातील शेरलॅाकबद्दल वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रीया होत्या[८].
- (२०१५) मि. होम्स, सर आयन मॅकलेन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात शेरलॅाकच्या निवृत्तिकालाचे चित्रण आहे[९].
संदर्भ
[संपादन]- ^ बीबीसीच्या मालिकेचे पान
- ^ संदर्भ वा कथा?
- ^ https://en.wikipedia.org/wiki/Sherlock_Holmes_(1984_TV_series)
- ^ http://www.imdb.com/title/tt0988045/?ref_=fn_tt_tt_5
- ^ http://www.imdb.com/title/tt1515091/?ref_=fn_tt_tt_6
- ^ http://www.bbcamerica.com/anglophenia/2011/12/sherlock-vs-sherlock-robert-downey-jr-or-benedict-cumberbatch
- ^ बीबीसीच्या मालिकेचे पान
- ^ http://www.bbcamerica.com/anglophenia/2011/12/sherlock-vs-sherlock-robert-downey-jr-or-benedict-cumberbatch
- ^ http://www.imdb.com/title/tt3168230/
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |